Friday, September 17, 2010

SMS उत्तरे

आलेल्या प्रत्येक SMS ला उत्तर दिलंच पाहिजे या विचारसरणीवरच्या विश्वासापायी(!) मला उस्फूर्तपणे सुचलेली ही काही SMS उत्तरं.
बहुतेक उत्तरं ही "Good Night" च्या sms ना आहेत असं तुम्हाला वाटल्यास त्याला अजिबात योगायोग समजू नये. ;)

ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या जागी अचानक सुचलेल्या ओळी असल्याने (आणि reply पटकन करणे आवश्यक असल्याने!) बर्याचदा यमक, छंद, मात्रा, गण वगैरेची धूळधाण झालेली आहे तरी कृपया समजून घ्यावे (किंवा जोड्याने मारावे!) :)

या सगळ्या खटाटोपाची गरजंच काय? म्हटलं तर काहीच नाही नी म्हटलं तर खूप सारी.!
"कुठल्याही प्रसंगाला केवळ गद्यातच नव्हे तर वेळ पडल्यास पद्यातही आपल्याला उत्तर देता येऊ शकते हा आत्मविश्वास" एवढं एक कारण सुद्धा पुरेसंय . :P

काही ओळींचे संदर्भ कळणार नाहीत. त्यासाठी त्यांची आधीची गोष्ट परत कधीतरी लिहीन. तूर्तास क्षमस्व. :-)

असो..

~ निखिल -


-----------------------------------

झोप कशी येत नाहीये तुला?
वाट पहातोय स्वप्नांचा झुला
गेली नाहीस तर होईल खुळा
असं कसं चालेल माझ्या फुला?

-----------------------------------

मला झोपंच यायची नाही
असा खेळ क्वचित घडायचा
प्रेमात पडलोय मी... आता
तो हिशोब चुकता व्हायचा

-----------------------------------

झोपेसाठी तुझ्या रे पाखरा
तिने शोधला शांत निवारा
पेटू दे वात स्वप्नांची
माय देते दारात पहारा

-----------------------------------

माऊला माझ्या आलीये झोप
देतेय जांभया दाबून ओठ

तुझ्या झोपेला आधण चढू दे
मस्त झोपवतो, जरा कुशीत ये

-----------------------------------

झोपंच कशी तिला येत नाय
सखुला माझ्या झालंय काय
पडून विचार ती करते हाय
कसचं काय नी फाटक्यात पाय

-----------------------------------

कविराजांना होतंय काय?
त्यांचं त्यांनाच कळत नाय
विचार करून थकलेत खूप
पण उत्तर काही मिळत नाय

-----------------------------------

मजाय एका मुलाची
खातोय देठं पानाची

पोपट म्हणा पेरू चरणार
माकड म्हणा चाळे करणार!

-----------------------------------

कधी एकटं असतांना
दर श्वासागणिक सुचतात ओळी
शब्दं होतात कार्यक्षम
पण कार्यक्षमतेला अफूची गोळी

-----------------------------------

रंगलेल्या प्रत्येक मैफिलीच्या विधीलिखीतात
कधीतरी शेवट असतोच लिहिलेला
पण तो असतो नेहमी वर्तमानाला
कधीच नसतो आठवणींच्या कोंदणाला

----------------------------------------------

Sunday, August 29, 2010

ग्यारीचा पोवाडा

आमच्या बेंगळूरूमधल्या टोळीतला एकजण, गिरीश उर्फ ग्यारी हा मुळचा मंचर गावचा राहणारा.
याला एका पार्टीमध्ये लोक मंचर गावातल्या एका पूजा नावाच्या मुलीवरून चिडवत होते.
तो बिचारा मनापासून सांगायचा प्रयत्न करत होता की असं काही नाहीये, ती फक्त माझी कॉलेजमधली एक मैत्रीण आहे.

पण लोक कुठले त्याला सोडायला.. थोड्या वेळाने सगळेजण त्याला नाव घे म्हणुन हात धुवून मागेच लागले.
ग्यारी चक्क लाजत होता.
"अरे नाही रे.., तसं काही नाहीये..",
"ह्या सगळ्या अफवा या दर्शनमुळे पसरल्या आहेत..",
"अरे पण मला नाव नाही घेता येत रे.."
असे स्वतःला वाचवायचे निष्फळ प्रयत्न तो करत असतांनाच मला अचानक त्याच्या मदतीला धावायची इच्छा झाली.
बसल्या जागी नाव घेण्यासाठी पहिल्या दोन ओळी सुचल्या.. मग मीच ग्यारी ऐवजी नाव घेतलं..
लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद बघून मला अजून स्फुरण चढलं आणि तिथल्या तिथे अजून काही ओळी सुचल्या ('प्रसवल्या' म्हणा हवा तर.! ;-) )

ह्याच त्या पोवाडासदृश्य ओळी...

ह्या ओळी पाच मिनिटात पार्टीमधल्या गर्दीत अचानक सुचल्या असल्याने यमक, प्रास, वृत्त वगैरे जे काय असतं ते सगळं बासनात गुंडाळलं गेलंय.. पण त्याला काही इलाज नाही.! ;-)

समस्त पोवाडे लिहिणार्यांची आणि शाहीर लोकांची (जाहीर) माफी मागून...



मंचर गावाला माझ्या, झालाय गाजावाजा
कारण पोरगी मला पटली न, नाव तिचा पूजा

आता आलाय रंगाला, ह्यो प्रेमाचा खेळ
न मी पेटलोय इरेला, जमवण्या सगळा मेळ

रुपानं देखणी, तिचा बांधा डौलदार
अता मला उरलाया, स्वर्ग बोटे चार

पुरता झालुया बेभान हे खूळ डोक्या मंदी
सुचतोय पोवाडा जरी मी नाही अनंत फंदी

Tuesday, April 6, 2010

एक संध्याकाळ...

एक संध्याकाळ...

एक अशीच निरस, उदास संध्याकाळ.. एकटेपणाच्या अंधारात ढकलून देणारी..
Spiderman सारखं उंचावर कुठसं एकटं बसवून अपूर्णत्व पुन्हा दाखवून देणारी.

दमलेला दिवस अजून 'वेळ झाली नाही' म्हणुन उगाच रेंगाळलेला असतो.. जायची तयारी करून बसलेला, पण प्रत्यक्षात गेलेला नसतो.
दूरदूरच्या घरांचे, झाडांचे, विजेच्या खांबांचे आकार अंधुक अंधुक दिसत असतात.. दिवेही लागलेले असतात पण त्यांना अजून झळाळी आलेली नसते.
रस्त्यानं माणसं घरी निघालेली असतात, ती स्वतःच्याच विवंचनेत चालत असतात, रस्ते क्रॉस करत असतात, जिने चढत असतात... मध्येच एखादी मोटार हॉर्न वाजवून त्यांची तंद्री मोडत असते, पुढच्याच क्षणी ते पुन्हा तंद्रीत जात असतात.

वारा पडलेला असतो, झाडं धीरगंभीर झालेली असतात, डोक्यावर डास फिरत असतात,
बाकीचे पक्षी कधी जातात कोण जाणे, पण कावळे बिचारे इमाने-इतबारे या वेळेला घरी परतत असतात.
झाडाचं पान अन पान वारयासाठी आसुसलेलं असतं... पण
विधीलीखितात त्यानं आत्ता येणं लिहिलेलं नसतं...

एक भेसूर अस्वस्थता भरून राहिलेली असते, श्वासाची लय सापडत नसते,
मज्जातंतू, रक्तवाहिन्या, संवेदना.. सगळ्यांनाच कामाचा कंटाळा आलेला असतो.
मेंदुसुद्धा भरकटलेला असतो, कुठल्याही एका विचाराचा धागा पकडणं त्याला जमत नसतं, आपण नक्की कशा बद्धल विचार करतोय हे ठरवणं सुद्धा त्याच्या आवाक्याबाहेर गेलेलं असतं... चुकून एखादं गाणं गुणगुणावसं वाटलंच तर तेही दोन ओळींपेक्षा जास्त टिकणार नसतं...

आणि हे सगळं कमीच की काय म्हणुन आकाशात ना चंद्र असतो ना चांदण्या... किंवा अगदी अमावास्येचं काळभोर आकाशही नसतं.
नजर भिडावी असं कुठेच काहीच नसल्यानं शून्यात हरवलेली असते.
असा किती वेळ गेला कळलेलं नसतं. मग मी उठतो आणि कुठल्यातरी रस्त्यानं चालू लागतो...
पाय पुढे टाकणं, त्याबरोबर हातांची मागं-पुढं हालचाल करणं, तोल सांभाळणं, रस्ता ओलांडणं, सगळं काही यांत्रिकतेने चाललेलं असतं,
आणि तेवढ्यात अचानक हात पुढे करून तोंडानं काहीतरी बडबडत 'तो' समोर येतो. - एक रुपया द्या साहेब गरीबाला - असंच काहीतरी म्हणत असावा. मी यांत्रिकपणे खिसे चाचपून एक रुपया काढून देतो.

कृतीतली यांत्रिकता अजून संपलेली नसली तरी माझा मेंदू मात्र आता पुन्हा कार्यरत झालेला असतो, विचारांमध्ये सुसूत्रता येऊ लागलेली असते, डोक्यात प्रश्न भिनु लागलेले असतात...
"खरंच, याची सुद्धा ही संध्याकाळ अशीच गेली असेल का? हा या रस्त्याच्या कडेला कुणाची तरी वाट पहात शून्यात नजर लावून बसला असेल का? मनात कुठं एकटेपणाचं, अपुर्णत्वाचं रण पेटलं असेल का? यालाही पडलेला वारा, संवेदनाचं दुबळेपण यामुळे अस्वस्थता निर्माण झाली असेल का?"
मी त्याच्या खालावलेल्या डोळ्यांत खोलवर आत डोकावण्याचा प्रयत्न करतो, त्यातून काही समजतं का ते पहाण्याचा प्रयत्न करतो.
पण छे.. कारुण्य हा एकमेव भाव, बाकी फक्त गारगोट्या असतात त्या...

असं का व्हावं?? मनात विचारांचं काहूर माजतं.
सरतेशेवटी आकलनशक्तीच्या मर्यादा गाठल्यावर मी आजही पुन्हा एकदा त्याच निष्कर्षावर येणार असतो, अगदी तसाच सारांश पुन्हा एकदा काढणार असतो, मनातल्या सगळ्या प्रश्नांचा मिळून एकंच प्रश्न बनणार असतो...
"विरह, हुरहूर, घुसमट, ठेचकाळलेला स्वाभिमान, संवेदनांचा शिथिलपणा... सुरक्षित कवचात आतल्याआत येणारी ही पेल्यातली वादळं आहेत का? की फक्त भरल्या पोटींच सुचणाऱ्या या भावना आहेत?"

या नेहमीच्या सारांशरूपी अनुत्तरीत प्रश्नावर पोचल्यावर आता माझं मन थोडं शांत झालेलं असतं. शून्यातली नजर पुन्हा एकदा वास्तव्यात आलेली असते.
आणि अचानक जाणीव होते की मध्ये बराच वेळ गेलाय...
माझं लक्ष झाडाच्या फांद्यांमधून डोकावणाऱ्या अष्टमीच्या चन्द्राकडे जातं. तो आता मला नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत असतो.
वार्याची गार झुळूक माझं अंग-अंग रोमांचित करून जाते. मन एखाद्या अवखळ लहान मुलासारखं खुदकन हसतं...
सगळं जगंच हवंहवंसं, सुंदर दिसायला लागतं!

मी मनातल्या मनात 'त्या' चे आभार मानतो आणि घराच्या दिशेने पाऊल उचलतो.

खरंच... आयुष्यातल्या आनंदाचं, सुखाचं नव्यानं दर्शन घडण्यासाठी एखादा तपस्वी साधू किंवा स्वामीच भेटावा लागतो असं नसतं.!

~ निखिल -
------------------------------------------