Sunday, August 29, 2010

ग्यारीचा पोवाडा

आमच्या बेंगळूरूमधल्या टोळीतला एकजण, गिरीश उर्फ ग्यारी हा मुळचा मंचर गावचा राहणारा.
याला एका पार्टीमध्ये लोक मंचर गावातल्या एका पूजा नावाच्या मुलीवरून चिडवत होते.
तो बिचारा मनापासून सांगायचा प्रयत्न करत होता की असं काही नाहीये, ती फक्त माझी कॉलेजमधली एक मैत्रीण आहे.

पण लोक कुठले त्याला सोडायला.. थोड्या वेळाने सगळेजण त्याला नाव घे म्हणुन हात धुवून मागेच लागले.
ग्यारी चक्क लाजत होता.
"अरे नाही रे.., तसं काही नाहीये..",
"ह्या सगळ्या अफवा या दर्शनमुळे पसरल्या आहेत..",
"अरे पण मला नाव नाही घेता येत रे.."
असे स्वतःला वाचवायचे निष्फळ प्रयत्न तो करत असतांनाच मला अचानक त्याच्या मदतीला धावायची इच्छा झाली.
बसल्या जागी नाव घेण्यासाठी पहिल्या दोन ओळी सुचल्या.. मग मीच ग्यारी ऐवजी नाव घेतलं..
लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद बघून मला अजून स्फुरण चढलं आणि तिथल्या तिथे अजून काही ओळी सुचल्या ('प्रसवल्या' म्हणा हवा तर.! ;-) )

ह्याच त्या पोवाडासदृश्य ओळी...

ह्या ओळी पाच मिनिटात पार्टीमधल्या गर्दीत अचानक सुचल्या असल्याने यमक, प्रास, वृत्त वगैरे जे काय असतं ते सगळं बासनात गुंडाळलं गेलंय.. पण त्याला काही इलाज नाही.! ;-)

समस्त पोवाडे लिहिणार्यांची आणि शाहीर लोकांची (जाहीर) माफी मागून...



मंचर गावाला माझ्या, झालाय गाजावाजा
कारण पोरगी मला पटली न, नाव तिचा पूजा

आता आलाय रंगाला, ह्यो प्रेमाचा खेळ
न मी पेटलोय इरेला, जमवण्या सगळा मेळ

रुपानं देखणी, तिचा बांधा डौलदार
अता मला उरलाया, स्वर्ग बोटे चार

पुरता झालुया बेभान हे खूळ डोक्या मंदी
सुचतोय पोवाडा जरी मी नाही अनंत फंदी

2 comments:

Atul Thosar said...

एक नंबर मित्रा :)

Ameya joshi said...

पोवाड्याच्या चालीवर म्हणून बघितला... भट्टी जमली आहे.. हो हो हो हो हो.....हो......!!