Friday, August 7, 2009

आर्चिस गाडगीळ याला मी लिहिलेले ओर्कुट टेस्टीमोनीअल...

---------------------------------------------------------------------------
लिहायचं ठरवलं तर या माणसाबद्धल मी 4-5 पाने (वहीची.. झाडाची नव्हे!) तरी सहज लिहू शकेन!
पण या ठिकाणी तुम्हां लोकांना पकवण्याचा (किंवा घाबरवण्याचा!) उद्देश नसल्याने थोडक्यात आवरीन म्हणतो.
अनं असंही कोकणस्थांना फार घोळ घालणं शोभत नाही आणी 'allowed' तर नसतंच नसतं! [;)]

तरीही तुम्हास हौस असेल तर (असते एकेकाला..) आणी अधिक माहिती (सिक्रेट्स??) हवी असल्यास कधीही भेटा...
इत्यंभुत (होय मराठी शब्दय हा..!) माहिती देईन..

असो... नमनाला घडाभर तेल झाले.. आता सरळ मूळ मुद्यावर येतो (आलारे एकदाचा!)

आर्चिस... या माणसाच्या वेगळेपणाची सुरवात याच्या नावापासुनच होते..
हा माणूस 'प्ल्यानिंग' चा बादशहा आहे... तसं प्ल्यानिंग तर खूप लोक करतात पण आर्चिस ची विलक्षण गोष्ट म्हणजे हा प्राणी त्यातले जवळपास 10% प्लान्स खरे पण करतो.. 10% खूप जास्त होतात..माझ्या सारख्या सामान्य माणसाची ही टक्केवारी बहुदा 0.05% असावी...
काय तुमचे काय मत आहे या बद्धल? एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायचीये या बाबतीत..[;)] (अ'पू.ल.'कीत लोकांना ही कोटी समजणार नाही.. तरी क्षमस्व! )

कधी भेटलात (जरूर भेटा!) तर या माणसाचे खिसे तपासा(जपून).. मी लिहून देतो की याच्या खिशात नक्की 'आजची कामे' अशी लिस्ट सापडेल!

एकटं रहात असूनही घर एवढे स्वच्छ ठेवणारे लोक तसे विरळा.. आर्चिस त्यातला एक आहे हे सांगणे 'न'लगे!

काही राक्षसांचा जीव कसा पोपटात वगैरे असतो..तसा आर्चिसचा जीव लॅपटॉप, चारचाकी, स्प्लेंडर, कॅमेरा इत्यादी गोष्टींमध्ये थोडा थोडा वाटलेला आहे!

लेका आठवतंय का आपण अनेकदा नाशकात कॉलेजरोडवर, पुण्यात, हो आणी एकदा जीवधनच्या रस्त्यावर तुझी स्प्लेंडर घेऊन किती दंगा केलाय, किती पाठलाग(!) केलेत... 'सोनेरी दिवस' दुसरं काय!

या पुढचं इंग्रजी भाषेत लिहावं का? नको.. मराठी भाषेतल्या शब्दांमध्ये जी विलक्षण ताकद आहे ती त्या वाघिणीच्या दुधात(!) नाही.. काही लोक याला कुत्च्छितपणे 'कोल्ह्यास द्राक्ष आंबट..' असेही म्हणू शकतात.. म्हणोत बापडे!
(वाह वाह! काय पण वाक्यरचना सुचताहेत आज...शाब्बास निखिल! सॉफ्टवेअर कंपनी मधून 'ले-ऑफ़' झाल्यास कुठल्याश्या वर्तमानपत्रात 'आजचे राशी-भविष्य लिहीणारा' म्हणून काम मिळण्याची शक्यता वाढून पोटा-पाण्याचा प्रश्न तरी सुटेल! [;)] )

असो.. हे थोडे(?) विषयांतर झाले...

या मुलाने (की माणसाने?) मला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे प्रचंड मदत केलीये.. मुख्यतः काही निर्णय घेण्यात..
आहे ड्यूड माझ्या लक्षात आहे सगळं!

हा बेट्या आता लग्न देखील करतोय.. तेही 'लव्हा'तलं मॅरेज!
मित्रा तुझ्या आयुष्यातल्या समस्त घडामोडींसाठी आणी एकंदर सगळ्याचं गोष्टींसाठी तुला मनःपूर्वक शुभेच्छा!

असाच्च दंगा करत रहा!
मी प्रार्थना करतो की साउथ आफ्रिका, बंगलोर, पुणे, अमेरिका अशी आपली भटकंती संपली की कधीतरी आपण पुन्हा
एकदा एकाच देशात आणी मुख्यतः एकाच शहरात रहात असू!
या गोष्टीवर चीअर्स!

आपला कृपाभिलाषी(!),
मनोहरांचा निखिल~

(या कृपाभिलाषी शब्दाचा अर्थ मला कोणीतरी सांगा रे.. बक्षिस देईन! बहुदा 'दयेस पात्र' असा अगदीच गरीब अर्थ असावा.. पण करता काय? सगळे वापरतात..मीही वापरतो झालं!)

ता.क्.
वरील लिखाणात माझ्याकडून कुणाच्या कासोट्याला (अर्थात सोडण्यासाठी!) चुकून हात घातला गेला असेल तर क्षमस्व!
बाकी तुम्ही लोक सुज्ञ आहात असे गृहीत धरतो आणी आपली रजा घेतो! [:)]

No comments: